मुंबई : जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाने मे. हाय ग्राउंड एंटरप्राइजेस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक संदीप उर्फ करण अरोरा याला अटक केली आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी ही अटक झाली. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे.

वस्तू किंवा सेवा न पुरवताच, प्रत्यक्ष पावत्यांखेरीजच बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मंजूर केल्याच्या, उपलब्ध केल्याच्या आणि वापर केल्याच्या आरोपांखाली ही अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या तपासानुसार मे. हाय ग्राऊंड एण्टरप्राइजेस लिमिटेडने सुमारे 420 कोटी रुपये मूल्यांच्या पावत्यांच्या आधारे सुमारे 77 कोटी रुपये बनावट आयटीसी उपलब्ध करुन दिले. मे. हाय ग्राऊंड एण्टरप्राइजेस लिमिटेडने इनव्हाइसेस केलेल्यांपैकी अनेक कंपन्या बनावट असल्याचे आढळून आले आहे.

नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरु, पुणे इत्यादी ठिकाणी यासंदर्भात घालण्यात आलेल्या छाप्यांमधून आणि नोंदवण्यात आलेल्या जबानीतून संदीप उर्फ करण अरोरा हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत आहे.

सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागासारख्या इतर संस्थाही अरोराबाबत तपास करत होत्या. व्हॅट घोटाळ्याप्रकरणी इंग्लंड सरकारही त्याचा शोध घेत होते.