नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर मारला गेला असून त्याची ओळख पटली असल्याचं अमेरिकी गुप्तचर यंत्रणेनं जाहीर केलं आहे. मलिक फैजल अक्रम या ४४ वर्षांच्या ब्रिटीश नागरिकाने कॉलिव्हिले गावातल्या सिनेगॉगमधे शब्बाथची प्रार्थना चालू असताना किमान ४ जणांच्या मुसक्या बांधून त्यांना ओलीस धरलं होतं. अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरलेला पाकिस्तानी वैज्ञानिक आफिया सिद्दिकीला मुक्त करण्याची मागणी त्यानं केली होती. संबंधित कारवाईत तो मारला गेला असून याप्रकरणात इतर कोणाचाही हात असल्याचं आढळलं नाही असं एफ बी आयच्या पत्रकात म्हटलं आहे. या कारवाईबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी एफ बी आय आणि स्थानिक पोलिसांचं कौतुक केलं आहे. हा दहशतवादी हल्ला होता असं सांगून ते म्हणाले की अमेरिका अशा प्रकारांना तोंड द्यायला समर्थ आहे. हल्लेखोरानं सिनेगॉगची निवड का केली याचं कारण समजू शकलं नाही असं त्यांनी सांगितलं.