नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 73 वा प्रजासत्ताक दिन आज उत्साहात आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा होत आहे. 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत राजपथ इथं आज भव्य संचलन झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. त्याआधी सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पमाला अर्पण केल्या.
राजपथावरच्या संचलनात लष्कराच्या सहा, नौदल आणि वायू दलाच्या प्रत्येकी एक, सशस्त्र दलाच्या चार, दिल्ली पोलिसांच्या एक, एनसीसीच्या दोन तर एनएसएसच्या एका पथकानं सहभाग घेतला. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या १२ तर विविध मंत्रालय आणि विभागाच्या ९ चित्ररथांनी आजच्या संचलनात सहभाग घेतला होता. भारताचं लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता तसंच सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर या संचलनात भर देण्यात आला होता.
आजच्या संचलनाच्या प्रेक्षकांमध्ये यावेळी समाजातल्या अनेक घटकांचा समावेश करण्यात आला होता. यात रिक्षा चालक, बांधकाम कामगार, सफाई कर्मचारी तसंच आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिन हा आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्वांसाठी न्याय या महत्त्वाच्या तत्त्वांवरील विश्वासाची पुष्टी करण्यासाठी योग्य प्रसंग आहे, असं नायडू यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. ज्यांच्या निस्वार्थ बलिदानामुळे या महान प्रजासत्ताकाचा जन्म झाला, त्या स्वातंत्र्यसैनिकांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा प्रसंग आहे, असंही ते म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी देशवासियांना आपल्या प्रजासत्ताकाच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचे, तसंच शांततापूर्ण आणि प्रगतीशील भारताच्या निर्मितीसाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये सिंह म्हणाले की, आजचा दिवस लोकशाही साजरा करण्याचा आणि आपल्या संविधानात अंतर्भूत असलेल्या कल्पना आणि मूल्यांचे जतन करण्याचा प्रसंग आहे. संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या निरंतर प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
गृहमंत्री अमित शहा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय प्रजासत्ताकाचा अभिमान, एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व सैनिकांना ते नमन करतात. स्वातंत्र्याच्या लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी आज सर्वांना प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले.