नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना उद्या प्रकाशित केली जाणार असून हरकती आणि सूचना, त्यावरील सुनावणी आणि अन्य कायदेशीर सोपस्कार पार पाडून ती २ मार्च रोजी अंतिम केली जाणार आहे. यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार असून त्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान पुणे महापालिकेमध्ये ५८ प्रभाग असतील आणि प्रत्येक तीन सदस्यीय प्रभागाची सरासरी लोकसंख्या ६१ हजार ६६९ च्या आसपास असेल. निवडणूक आयोगाने २०११ या वर्षाच्या जनगणनेनुसार ३५ लाख ५६ हजार ८२४ ही लोकसंख्या समोर ठेवून ही रचना केली आहे.