नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन २०२२-२३ चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं, सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं. हा अर्थसंकल्प म्हणजे २०४७ वर्षापर्यंतची रुपरेषा असल्याचं, सीतारामन यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर ९ पूर्णांक २ दशांश टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. चालू वर्षात वित्तीय तुटीचा सुधारित अंदाज ६ पूर्णांक ९ दशांश टक्के असून वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण खर्च ३९ लाख ४५ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचं संचलन सात इंजिनद्वारे केलं जाणार आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक, सागरी वाहतूक तसंच लॉजिस्टीक सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात  गुंतवणूक केली जाणार आहे. जागतिक दर्जाच्या इतर पायाभूत सुविधासुद्धा विकसित करण्यावर जोर दिला जाईल. राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईनद्वारे प्रधानमंत्री गती शक्ती आराखडा जोडला जाईल. यामुळे देश एक परिवर्तनात्मक पाऊल उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.अंदाजपत्रकात चार प्रधान्यक्रम ठरवले असून यामध्ये गतीशक्ती,  सर्वसमावेशक विकास, ऊर्जा परिवर्तन आणि गुंतवणूकीचं वित्तीय पोषण यांचा समावेश असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.