मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महानगरपालिकांची प्रारुप प्रभाग रचना काल जाहीर झाली. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेचे २३६, तर नवी मुंबई महापालिकेचे ४१ प्रभाग झाले आहेत त्यावर सूचना आणि हरकतीसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचं विवरणपत्र १६ फेब्रुवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर केलं जाईल. हरकती आणि सूचनांवर २६ फेब्रुवारीला सुनावणी होईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी राज्य निवडणूक आयोगास २ मार्चला पाठवल्या जातील. कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेत. त्रिसदस्य प्रभाग रचनेमुळे ३१ प्रभाग झाले असून ९२ नगरसेवक असतील. महापालिका निवडणूक कार्यालयासह, शहरातली चार विभागीय कार्यालयं आणि महापालिकेच्या वेबसाईटवर प्रभाग रचना पाहता येईल. नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार, ४३ प्रभाग ३ सदस्यीय, तर एक प्रभाग चार सदस्यांचा आहे. अमरावती महानगरपालिकेच्या एकूण ९८ सदस्यांकरता ३३ प्रभागांचे प्रारूप नकाशे काल जाहीर करण्यात आले. त्यापैकी ३२ प्रभाग हे ३ सदस्यांचे असून, १ प्रभाग २ सदस्यांचा आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेनुसार, ३८ प्रभागात ११३ सदस्य निवडले जाणार आहेत. पालिकेच्या १ ते ३७ प्रभागात तीन सदस्य, तर ३८ व्या प्रभागात केवळ दोन सदस्यांची निवडणूक होणार आहे.