मुंबई (वृत्तसंस्था) : आर-टी-ई अर्थात शिक्षणाचा अधिकार कायद्या अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचे ऑनलाईन अर्ज येत्या १६ फेब्रुवारीपासून भरता येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. अर्ज भरण्याचं संभावित वेळापत्रक आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध झालं असून त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी देण्यात आली होती. मात्र आता हे अर्ज १६ फेब्रुवारीपासून भरता येतील. त्यामुळे या बदलाची पालकांनी नोंद घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्या अंतर्गत समाजातल्या वंचित आणि दुर्बल गटाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व आस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.