नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि बँकेचे माजी संचालक दलजीत सिंग बल यांना काल बिहारमधील रक्सौल इथं भारत-नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आली. आरोपी नेपाळच्या मार्गानं पळून जाण्याचा विचार करत होता,असं पूर्व चंपारणचे पोलीस अधीक्षक कुमार आशिष यांनी सांगितलं. पीएमसी बँकेचे माजी संचालक दलजीत सिंग बल हे ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे मुख्य आरोपी आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनंतर आरोपीला रक्सौलच्या इंटिग्रेटेड चेक पोस्ट इथं अटक करण्यात आली,असं पोलिस अधीक्षकांनी सांगितलं. दलजीत सिंग बल याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.