मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या खाली आली आहे. राज्यात काल ६ हजार १०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. १६ हजार ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख १६ हजार २४३ जणांना कोरोनाची लागण झाली, त्यापैकी आतापर्यंत ७५ लाख ७३ हजार ६९ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार १५५ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ९६ हजार ६९ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ८९ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. राज्यात कालही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत ३ हजार ३३४ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली त्यापैकी २ हजार ४३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.