मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कॅन्सर प्रतिबंधक “होप एक्स्प्रेस” सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. कोल्हापूरमधल्या एका खासगी रुग्णालयातल्या अत्याधुनिक मोझॅक-३ डी तंत्रज्ञानावर आधारित रेडीएशन मशीनचं टोपे यांनी आज रिमोटद्वारे लोकार्पण केलं, त्यावेळी ते बोलत होते. अशाप्रकारचं हे भारतातलं पहिलंच मशीन आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होप एक्स्प्रेस सुरू करायला पुढाकार घेऊ, असं आश्वासनही टोपे यांनी दिलं आहे.

यावेळी टोपे यांनी गडहिंग्लज इथल्या हत्तरकी रुग्णालयात सुरू होणार असलेल्या ऑन्कोप्राइम कॅन्सर सेंटरचंही ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन केलं. या केंद्राचा ग्रामीण भागातल्या रुग्णांना लाभ होणार आहे. यावेळी टोपे यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी द्यायच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सुरु असलेल्या वादावरही भूमिका मांडली. हा निर्णय दारूला प्रोत्साहन देण्यासाठी नाही, तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या लाभासाठी घेतला आहे, असं ते म्हणाले.