नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्या प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयानं दोन महिन्याची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिली होती अशी तक्रार चांदूर बाजार इथल्या गोपाल तिरमारे यांनी आसेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, सुनावणीसाठी हे प्रकरण चांदूरबाजार प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आलं होतं. त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं बच्चू कडू यांना दोषी मानत, त्यांना शिक्षा सुनावली. बच्चू कडू यांनी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे, त्यांनी नैतिक जबाबदारीतून आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि जनतेची माफी मागावी अशी प्रतिक्रिया तक्रारदार गोपाल तिरमारे यांनी दिली आहे.