केंद्र व राज्यांनी कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी बागायती व मत्स्यपालनासारख्या पूरक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची आवशक्यता : स्वर्ण भारत ट्रस्टमधील समारंभात ‘रयथू नेस्थम पुरस्कार-2019’ प्रदान केले

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी कृषी क्षेत्राला फायदेशीर व शाश्वत बनवण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करण्यावर जोर दिला.

‘रयथू नेस्थम’ प्रकाशनाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आज हैदराबाद इथे स्वर्ण ट्रस्टमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ‘रयथू नेस्थम पुरस्कार’ आणि ‘पासु नेस्थम’ तसेच ‘प्रकृती नेस्थम’ या इतर दोन नियतकालिकांना पुरस्कार प्रदान करताना उपराष्ट्रपतींनी केंद्र व राज्यांनी कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे, अशी विनंती केली.

60 टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, असे सांगताना ते म्हणाले की, कृषी क्षेत्राला प्रोत्साहन द्यायला आणि त्याला व्यवहार्य व किफायतशीर बनवायला प्राधान्य दिले पाहिजे. देशात कृषी नवजागराची गरज असल्याचे लक्षात घेत त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याखेरीज विमा, सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे.

भारतीय शेतकरी कोट्यावधी लोकांचे अन्नदाता आहेत, ही बाब निदर्शनास आणून नायडू म्हणाले की, एकीकडे शेती उत्पादकांना कमी फायदा मिळत आहे तर दुसरीकडे व्यापारी अधिक नफा कमवत आहेत. सरकारने आणि नीती आयोगाने याकडे लक्ष देवून संरचनात्मक बदल घडवून आणावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा योग्य हक्क मिळेल.

उपराष्ट्रपतींनी कृषी क्षेत्रातील विविधता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी फलोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि रेशीम संवर्धनासारख्या पूरक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यावर देखील भर दिला. अन्नप्रक्रिया हे असे एक क्षेत्र आहे ज्यात अपार क्षमता आहे आणि त्याचा संपूर्ण फायदा करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

शेतीसाठी लागणारा खर्च कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी वैज्ञानिकांना विनंती करत नायडू यांनी कृषी अभ्यासक्रम सुधारण्याचा आग्रह केला जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचा 50 टक्के वेळेत शेतीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधता येईल. शेतात शेतकऱ्यांबरोबर वेळ घालवणे हा विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा मोठा अनुभव असेल, असेही ते म्हणाले.

दैनंदिन जीवनशैलीतील चुकीच्या पद्धतींमुळे आजारांच्या वाढत्या धोक्यापासून लोकांना सावध करणे आणि निरोगी आहार पद्धती अवलंबण्याचे महत्व देखील त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुन्दरराजन, आंध्रप्रदेश राजभाषा आयोगाचे अध्यक्ष येरलागड्डा लक्ष्मीप्रसाद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.