नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत जनगणना भवनाचे भूमीपूजन झाले. देशाची शास्त्रीय पद्धतीने जनगणना होणे हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे असे मत अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केले. केवळ सामाजिक दृष्टीनेच नव्हे तर सरकारच्या विकासाच्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जनगणना आवश्यक आहे असे ते म्हणाले. या जनगणना भवनाच्या उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल आणि 2021 च्या जनगणनेची आकडेवारी याच इमारतीतून जाहीर केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

जनगणना ही प्रक्रिया जनभागीदारीतून पूर्ण व्हायला हवी असे सांगत त्यासाठी 130 कोटी नागरिकांना त्याचे महत्व पटवून सांगणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. पूर्वी ही प्रक्रिया विकेंद्रीत होती. प्रत्येक गावांमध्ये जनगणना केली जाऊन तिचे आकडे संकलित केले जात. मात्र आता तंत्रज्ञानामुळे ही आकडेवारी डिजिटल पद्धतीने एकाच ठिकाणी संकलित केली जावू शकते असे ते म्हणाले. या प्रक्रियेत जनता स्वत:च घर बसल्या आपली आणि कुटुंबियांची माहिती भरु शकतील आणि हे काम सोपे होईल असे ते म्हणाले. त्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर केला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री नित्यानंद राय देखील उपस्थित होते.