नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संत रविदास यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविदास जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु रविदास यांनी भेदभाव विरहीत परस्पर प्रेम आणि समतेच्या वर्तनाचा संदेश दिला आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गानं जाऊन आपण सर्व जण समता, समरस्ता आणि समन्वयाधिष्ठीत समाज उभारण्यात योगदान देऊया असं राष्ट्रपतींनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत करोल बाग इथं गुरु रविदास विश्राम धाम मंदिराला भेट दिली. तिथल्या शबद किर्तनात सहभागी झाले. तसंच जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी संत रविदासांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं. संत रविदास हे समाजसुधारक होते त्यांनी आपल्या कार्यातून सामाजिक विषमता तसंच वाईट चालीरितीवर परखड मत मांडलं. बंधुता आणि एकात्मतेविषयी त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात रविदासांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं.