नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये युद्ध व्हावं असं आपल्याला वाटत नसल्याचं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर म्हटलं आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयोजित संयुक्त परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
हा संघर्ष मिटवण्यासाठी राजनैतिक पातळीवर चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं तसंच अमेरिका आणि नाटो राष्ट्रांबरोबरचा विश्वास बळकट करण्यासाठी चर्चा करण्याची रशियाची तयारी असल्याचं ते म्हणाले.
युक्रेनबरोबरचं युद्ध राजकीय पातळीवरच्या चर्चेद्वारे सोडवण्याच्या रशियाच्या विचाराशी आपण सहमत असल्याचं जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज यांनी म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मॉस्को इथं झालेल्या चर्चेत सुरक्षेबाबतचे प्रयत्न जारी राखण्याच्या मुद्द्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली.
रशियाच्या घोषणेचं नाटोचे महासचिव जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी स्वागत केलं आहे. मात्र रशियाच्या घोषणेमुळे युद्ध रोखलं जाण्याची आशा वाढली असली तरी जमिनीवरचा तणाव निवळल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आपलं सैन्य मागे घेतल्याच्या रशियाच्या घोषणेबाबत युक्रेननं शंका व्यक्त केली आहे.