नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात मधल्या अहमदाबाद इथं २००८ साली झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात आज गुजरातच्या विशेष न्यायालयानं ३८आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायालयाचे न्यायमुर्ती ए आर पटेल यांनी हा निर्णय दिला. याबरोबरच ११ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या बॉम्ब स्फोटात ५४ जणांचा मृत्यू झाला होता. या सर्व आरोपींवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा, विस्फोटक प्रतिबंधक कायदा अशा अनेक कायद्यांतर्गत खटला सुरू होता. या स्फोटात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये तसंच गंभीर जखमींना ५० हजार रुपये मदत देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं मृत्युची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या महिन्याच्या ११ आणि १४ तारखेला न्यायालयानं बचाव पक्षाला आपली बाजू मांडण्याची शेवटची संधी दिली होती. न्यायलयानं २८ आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. तर, ४९ आरोपींना दोषी ठरवलं. गुजरात पोलिसांनी कसून चौकशी केल्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा झाली, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. २००८ साली दोन रुग्णालयं तसंच गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट करण्यात आले होते. एकूण २३ स्फोट घडवण्यात आले होते.