मुंबई (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या शेअर बाजारात, रोखे आणि कमोडिटी हाहाकार माजला आहे. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या शेअर बाजारातही तीच परिस्थिती आहे. व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स अठराशे हून अधिक तर निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी कोसळला होता. नंतर व्यवहारादरम्यान थोडीफार सुधारणा दिसली मात्र दुपारनंतर बाजारात सुरू असलेली घसरण मोठ्या प्रमाणात वाढली. दुपारी पावणे ३ च्या सुमारास सेन्सेक्स २ हजार २०० अंकांहून अधिक तर निफ्टी पावणे ७०० हून अधिक अंकांनी कोसळला होता. सेन्सेक्सनं व्यवहारादरम्यान ५५ हजारांची आणि निफ्टीनं १६ हजार ४०० ची पातळी तोडली होती. सेन्सेक्समधल्या सुमारे साडे ३ हजार समभागांपैकी ३ हजारांहून अधिक कोसळले होते तर केवळ २०० हून अधिक वधारले होते. ब्रेंट क्रुड ७ वर्षातल्या उच्चांकी अशा १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचलं होते.