मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं राज्यात भारनियमन करावं लागू शकतं असे संकेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात सध्या ६ लाख ७५ हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे. राज्यातील ७ वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये रोज एक ते दीड लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो मात्र तुटवडा झाल्यास भारनियमन होऊ शकतं, असं ते म्हणाले. अकोला जिल्ह्यात जिल्ह्यातल्या वीज उपकेंद्राचं लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. वीज बिल न भरणाऱ्या सर्वांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. त्यात कुणालाही सवलत दिली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वीज बिल न भरणाऱ्यांची वीज तोडण्याची मोहिम राज्यात सुरू आहे. त्यावरुन अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.