नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात काल आणि आज अवकाळी पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात काल संध्याकाळी गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जवळपास ११ गावातील अकराशेहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासन आणि कृषी विभागानं पाहणीसह पंचनाम्याला देखील सुरुवात केली आहे. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पालघर जिल्ह्यातल्या काही भागातही आज सकाळी पाऊस झाला. आज सलग दुसर्याभ दिवशी धुळे शहर आणि जिल्ह्यात पाऊस झाला. काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून धुळे तालुक्यात बोरसुले गावात एका विवाहितेचा मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली. शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाली असून पिकांचं नुकसान झालं आहे.