नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधली संघर्ष स्थिती बिकट होत असून तिथल्या नागरिकांवर ओढवलेल्या संकटावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे, असं मत भारतानं काल संयुत राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केलं. गेल्या 11 दिवसांमध्ये युक्रेनमधून 15 लाख लोकांना स्थलांतर करावं लागलं असून मानवतेवर हे मोठं संकट असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तीरुमूर्ती यांनी सांगितलं.

युक्रेनच्या पूर्व भागातल्या सुमी विद्यापीठात भारताचे शेकडो विद्यार्थी अडकून पडले असून दोन्ही देशांना अनेक वेळा विनंती करूनही अद्याप या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढता आलं नसल्याचंचंही त्यांनी सांगितलं. युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या चर्चेच्या पहिल्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर काल रात्री बेलारूसमध्ये झालेल्या तिसऱ्या फेरीत सकारात्मक चर्चा झाली. युक्रेनमधून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचंही दोन्ही देशांनी मान्य केलं. मात्र, सीमेवरील परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याबाबत कोणताही तोडगा यावेळी झालेल्या चर्चेतून निघाला नाही. शस्त्रसंधी होण्यासाठी यापुढेही चर्चा सुरु ठेवण्यास तयार असल्याचं दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. दरम्यान, रशियाच्या आक्रमणाविरोधात युक्रेनला यापुढंही मदत करण्याचा आणि रशियाला धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार कायम असल्याचं काल अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन या देशांनी काल स्पष्ट केलं. या चार देशांच्या प्रमुखांनी काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत युक्रेन प्रश्नावर चर्चा केली.  हंगेरी सरकारनंही रशियाविरोधात कारवाईसाठी नाटो सैन्याला आपल्या देशात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे, तर कॅनडानेही रशियाच्या 10 व्यक्तींवर निर्बंध लागू केले आहेत.