मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचनेसह निवडणूक तयारीचे निवडणूक आयोगाकडील वैधानिक अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या विधेयकावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वाक्षरी केली. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आघाडीच्या इतर नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं. या सुधारित कायद्यामुळे निवडणुक घेण्याचा अधिकार वगळता, प्रभागांची संख्या आणि विस्तार निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रांची प्रभागामध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची,राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेली किंवा पूर्ण केलेली प्रक्रिया रद्द करण्याची तरतूद या कायद्यात आहे. हे सर्व अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत.