नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता असून त्यासाठी अद्ययावत प्रशिक्षणाची गरज आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते गांधीनगर इथल्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या इमारतीचं लोकार्पण झालं. या विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं.
लोकशाही व्यवस्थेत जनतेला केंद्रस्थानी मानून समाजात ऐक्य आणि सद्भाव कायम राहावं या कार्यात पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. समाजविघातक शक्तींशी कठोरपणे आणि जनतेशी आपुलकीनं वागून पोलीस जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या सेवेमुळे त्यांच्यातला मानवीय चेहरा समोर आला, ही प्रतिमा अशीच कायम राहावी यासाठी पोलिसांनी सदैव दक्ष राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. पोलिसांना येणारा कामाचा ताण दूर करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठानं विशेष प्रशिक्षित तयार करावेत, असंही ते म्हणाले. सुरक्षा दलांसाठी तंत्रज्ञान हे एक नवीन हत्यार असून वाढते सायबर गुन्हे रोखण्यासह इतर सर्व कारवायांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असं त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आज गांधीनगरमध्ये रोड शो केला. खुल्या जीपमधून प्रवास करत त्यांनी नागरिकांना अभिवादन केलं.