पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. जी.बी.डेगलूरकर यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : वसाहतवादी शासकांनी तयार केलेल्या इतिहासात अनेक चुका असून, तरुण पिढीसमोर भारताचा खरा इतिहास मांडण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकेय्या नायडू यांनी केले.

पुण्यात आज प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. जी. बी. डेगलुरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान केल्यावर ते बोलत होते. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात अनेक प्रतिभावंतांनी दिलेल्या योगदानाचा दुर्दैवाने उल्लेख नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

देशात 3600 राष्ट्रीय महत्वाची स्मारके असून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण त्यांचे जतन आणि संवर्धन करत आहेत. या स्मारकांमधून देशाचा गौरवशाली इतिहास जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पुरातत्व स्थळांमध्ये वर्तमानाला भूतकाळाशी जोडण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचीन स्मारकांचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. ही पुरातत्व स्थळे सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी दत्तक घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले. शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना जवळच्या पुरातत्व आणि ऐतिहासिक स्मारकांना भेट देऊन ओळख करुन द्यावी आणि या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपराष्ट्रपतीं केले.