मुंबई (वृत्तसंस्था) : रस्ते प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा चांगला मोबदला मिळत असल्यामुळे लोकांचा विरोध मावळत असून लोक पुढाकार घेत आहेत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी प्रस्तावित पुणे – बंगळुरू नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, याला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात येणारे राज्यातील रस्ते प्रकल्प मार्गी लागावे यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं बारकाईनं लक्ष असतं त्यांची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. महामार्गासाठी सुपीक जमिनी जाऊ नयेत मात्र या महामार्गामुळे आसपासच्या परिसराची आर्थिक उन्नती होईल असं त्यांनी सांगितलं.