मुंबई (वृत्तसंस्था) : जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. आणि सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभाग आणि डेक्कन अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त माध्यमातून जुन्नरच्या संशोधन विकासासाठी रुसा आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली काम चालू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

सोलापूर विद्यापीठ आणि डेक्कन विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांकडून संशोधन सुरू आहे, त्याचबरोबर तेथील डाटा कलेक्शनचेही काम चालू आहे. याचबरोबर पुरातन वस्तू, शिल्प यांचे संग्रहालयदेखील उभारण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जात आहे. यामुळे सोलापूर विद्यापीठ व डेक्कन विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधकांना संशोधन व या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.