नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी अर्थात सक्त वसुली संचालनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसाचं विशेष तपास पथक तयार केलं असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभु यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन केलं असून, त्यांना आवश्यक तेवढा वेळ दिला जाईल, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या भाषणाविरुद्ध संभाव्य कारवाईबाबत विचारलं असता ते म्हणाले की, समाजात दुफळी आणि संघर्ष निर्माण करण्याचे काही प्रयत्न अलिकडे झाले आहेत.

सरकारनं त्यांची दखल घेतली असून त्यावर सरकारचं लक्ष आहे. राज्यात शांतता तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर पोलीस त्याविरुद्ध आवश्यक ती कारवाई करतील.