नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसंच शहरी विभागात मिळून तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली गेली आहेत. लोकसहभागामुळेच घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. ही घरं मूलभूत सुविधांनी सज्ज आहेत आणि महिला सक्षमीकरणाचं प्रतिक बनली आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. या कामगिरीमुळे देशातल्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्याच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं सरकारनं एक महत्त्वाचा पल्ला गाठला असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशात ग्रामीण भागासाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आत्तापर्यंत २ कोटी ५२ लाख, तर शहरी भागाच्या योजनेअंतर्गत ५८ लाखाहून अधिक पक्की घरं बांधली आहेत.