नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून हिवताप आणि क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं याकरता केंद्रसरकार एक सर्वसमावेशक कृती आराखडा आखत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जागतिक हिवताप दिनाच्यानिमित्तानं नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. वर्ष २०३० पर्यंत देशाला हिवताप मुक्त आणि २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशात हिवतापाच्या रुग्णांच्या प्रमाणात ८६ टक्के घट झाली असून २०१५ च्या तुलनेत हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात ७९ टक्क्यांनी घट झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.  हिवतापावर लस निर्मितीसाठी देशात प्रयत्न सुरु असून  लवकरच स्वदेशी लस तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  परजीवी कीटकांपासून पसरणाऱ्या रोगांबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती करणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार उपस्थित होत्या.