नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यासह महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. दिल्लीतलं विशेष पथक महाराष्ट्रात पाठवून सखोल चौकशी करावी, अशी मागणी या शिष्टमंडळानं गृह सचिवांकडे केल्याचं सोमय्या यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्य नागरिक, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर हल्ले, अत्याचार सुरू आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, अशी सात उदाहरणं गृहमंत्रालयाला दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर या पत्रात प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी या पत्रात उल्लेख केला आहे. मुंबई पोलिसांच्या आडून ही गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप फडनवीस यांनी केला आहे.