पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मतदारसंघात पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पिंपळेगुरव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन आणि सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. पदयात्रेदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी आमदार जगताप यांच्यावर फुलांची उधळण करत आणि फटाके वाजवून जंगी स्वागत केले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून आमदार जगताप यांना महाविजयासाठी शुभेच्छा दिल्या.

आमदार जगताप यांनी ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन सकाळी दहा वाजता सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरूवात केली. पदयात्रेच्या सुरूवातीलाच धनगर बांधवांनी अहिल्यादेवी पुतळा परिसरात गजीनृत्य सादर करून जोरदार वातावरणनिर्मिती केली. अहिल्यादेवी पुतळा परिसरात आमदार जगताप यांचे स्वागत होताच महिलांनी फुलांची उधळण करून त्यांचे जोरदार स्वागत केले.

आमदार जगताप यांनी जुनी सांगवीतील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर अहिल्यादेवी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली. पुढे ढोरेनगर, शितोळेनगर, बॅक ऑफ महाराष्ट्र, साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, पिंपळेगुरव, सृष्टी चौक, वैदुवस्ती, सुदर्श चौक, स्वराज गार्डन, पिंपळेसौदागर येथील काटे चौक, पिंपळेसौदागर गावठाण, रहाटणी, काळेवाडी, तापकीर चौकमार्गे थेरगाव येथील बापुजी बुवा मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेतले. पुढे चापेकर चौकातील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पदयात्रेचा समारोप केला.

या पदयात्रेदरम्यान जागोजागी भाजप नगरसेवक व शिवसेनेसह महायुतीतील अन्य घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे जंगी स्वागत केले. प्रत्येक चौकात आमदार जगताप यांच्यावर फुलांची उधळण करत आणि फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.