मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. तसेच विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.
मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संपूर्ण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.