नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एलआयसी अर्थात भारतीय जीवन वीमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी ही समभागांची प्राथमिक विक्री ९ मे पर्यंत सुरू राहील. यात गुंतवणूकदारांना ९०२ रुपये ते ९४९ रुपयांच्या किंमत पट्ट्यामध्ये किमान १५ समभागांसाठी बोली लावावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना यात ४५ रुपये तर एलआयसीच्या ३० कोटी वीमाधारकांना ६० रुपये सवलत मिळेल. त्यानंतर १७ मे रोजी हा समभाग देशातल्या शेअर बाजारांमध्ये खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होईल. २२ कोटी १३ लाख समभागांच्या विक्रीच्या माध्यमातून सरकार एलआयसीमधल्या त्यांच्या साडेतीन टक्के हिश्श्याची विक्री करणार आहे. बाजारातून भांडवल उभारणीचा विचार करता हा देशातला सर्वात मोठा IPO ठरणार आहे, अशी माहिती निर्गुंतवणूक सचिव तुहीन कांत पांडे यांनी दिली.