नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्यावर होणा-या संस्कारांवरही काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते पुण्यातील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या तेराव्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून राजनाथ सिंह यांच्यासह विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू डॉ. एन.जे. पवार आणि विविध विभागांचे अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जीवनात स्थितप्रज्ञ राहून संतुलन राखणं महत्त्वाचं असल्याचं सांगताना आपण राजकीय जीवनात असूनही हे तत्त्व पाळत असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. या पदवीप्रदान समारंभात फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना डॉक्टर ऑफ लेटर्स तर नागपूरच्या दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्र-कुलगुरू डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीनं सन्मानित करण्यात आलं.