नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ड्रोन तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर भारत ड्रोन महोत्सव २०२२ या देशातल्या सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ड्रोन तंत्रज्ञानातली भारताची झेप पाहता देशात यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी प्राप्त होतील, असं ते म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं प्रयत्न केले. भविष्यात शेतीसाठी ड्रोन चा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो असं ते म्हणाले. ड्रोन तंत्रज्ञान एका मोठया क्रांतीची सुरुवात आहे, हे स्वामित्व योजनेच्या सफलतेतून दिसून येतं, असं प्रधानमंत्री म्हणाले.

या योजनेअंतर्गत देशात पहिल्यांदाच गावांमधल्या जमिनीचं डिजिटल सर्वेक्षण होत आहे,  नागरिकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड वितरित केलं जात आहे, असं ते म्हणाले. याआधीच्या काळात तंत्रज्ञान आणि त्याचा लाभ हा केवळ समाजातल्या उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित होता मात्र आता त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसाठी केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरावर गेल्या काही महिन्यांपूर्वी असलेले निर्बंध सरकारनं काढून टाकले आहेत, या तंत्रज्ञानाविषयी भारतात जो उत्साह दिसून येत आहे तो अभूतपूर्व आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. या उर्जेमुळेच भारतात ड्रोन सेवा आणि ड्रोन आधारित उद्योगांना भविष्यात अपार संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारनं किमान सरकार आणि कमाल शासन हे धोरण अंगिकारलं असून तंत्रज्ञानामुळे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पोहोचवणं शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. ड्रोन उद्योगातल्या स्टार्टअप व्यावसायिकांशी प्रधानमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला आणि शेतात ड्रोनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचीही भेट घेतली. या कार्यकमात ड्रोन पायलट्सना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.