नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लघुपटांना प्रोत्साहन आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उत्तम उपक्रम आहे,असं अभिनेत्री अमृता सुभाष यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी आयोजित ‘मिफ्फ संवाद’ मध्ये त्या बोलत होत्या. त्यांच्या सोबत ‘मासा’ या मराठी लघुपटाच्या दिग्दर्शिका आणि नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर उपस्थित होत्या. संदेश कुलकर्णी लिखित हा लघुपट सासू-सुनेच्या नात्यातली गुंतागुंत हळुवारपणे मांडणारा असल्याचं खामकर यांनी यावेळी सांगितलं. १७ व्या मिफ्फ मध्ये ईशान्य भारतातील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती लाभत असून ‘द गालोस’,’ द सॉन्ग वुई सिंग’,’नादम’ यासह अन्य चित्रपटांच्या  निर्मात्यांनी आज प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या ‘ईशान्य राज्यांचं सक्षमीकरण’ या धोरणांतर्गत यंदा  मिफ्फमध्ये ईशान्येकडील १४ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या चित्रपटांची निवड करताना गुणवत्ता आणि वैविध्य या बाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही, असं ‘नॉर्थ ईस्ट फिल्म्स पॅकेज ऍट मिफ्फ’ चे क्युरेटर चंदन शर्मा यांनी ‘मिफ्फ संवाद’ मध्ये सांगितलं.