नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलात भारताची भूमिका नगण्य असली तरी पर्यावरण रक्षणात देश विविधांगानं प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्तानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या मृदा संधारण मोहिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. निर्धारित कालावधीपेक्षा पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचं उद्दिष्ट्य भारतानं साध्य केलं आहे, असंही ते म्हणाले.

विकसित झालेल्या पाश्चिमात्य देशांनी पृथ्वीवरील मृदा संपत्तीचं सर्वाधिक शोषण केलं आहे, इतकंच नाही तर सर्वाधिक कार्बन उत्सर्जनालाही ते जबाबदार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. स्वच्छ भारत अभियान, नमामि गंगे आणि एक सूर्य एक ग्रीड असे विविध पर्यावरण रक्षण करणारे विविध उपक्रम भारतात राबवले जात असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

याआधी शेतकऱ्यांमध्ये मातीच्या गुणवत्तेबाबत जागरूकता नव्हती. त्यांच्या जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक अभियान चालवण्यात आले आणि त्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड देण्यात आलं. आतापर्यंत २२ कोटींहून अधिक मृदा स्वास्थ्य कार्ड शेतकऱ्यांना दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.