मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिन दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोनं यात सहभाग घेतला.

अमरावतीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्यानं क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोनं निसर्ग भ्रमण आणि पक्षी निरीक्षणाचं आयोजन केलं होतं. आज सकाळी अमरावतीच्या बांबू गार्डन ते वडाळी तलावापर्यंत निसर्ग सफर आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान विभागीय वनअधिकारी नितीन गोंडाणे, निसर्ग अभ्यासक प्राध्यापक जयंत वडतकर यांच्याकडून विविध झाडे, वनस्पतींची आणि पक्षांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं.

नांदेड मधल्या मानवत तालुक्यातल्या पाळोदी इथं वृक्षदिंडी काढण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज नागपूरात अंबाझरी परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ८०० नागरिकांनी एकाचवेळी ९ किलोमीटरची अंबाझरी तलाव परिक्रमा केली आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला.

सोलापूर महानगरपालिका,सोलापूर वनविभाग आणि क्षेत्रीय लोकसंपर्क विभाग सोलापूर यांनी संयुक्तपणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पक्षी निरीक्षण, बीजगोळे निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. पहाटे ६ ते ८ वाजेपर्यंत पक्षी निरीक्षण करण्यात आलं. पक्षी निरीक्षक हेमंत हिरेमठ, निनाद शहा यानी पक्ष्यांचे स्वभाव, त्यांचे आवाज, त्यांच्या विविध प्रजाती या विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी पंकज चिंधरकर, संजय भुईटे आणि मंजू संगेपांग यानी बीजगोळे कसे बनवावे, त्याचा निसर्गासाठी कसा वापर करावा याबाबत कार्यशाळा घेवून सविस्तर माहिती दिली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या तळेगाव दिघे इथल्या दे. ना. गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने तिगाव ग्रामपंचायतीला पाण्यासाठी मदत म्हणून १०१ टँकर देण्यात आले.

पर्यावरण मित्र मंडळाने बुलढाणा शहरात सुरू केलेली चळवळआरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असल्याने सर्वांनी झाडे लावण्याच्या चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी सायकल रॅलीत सहभागी होताना केले. ४ ते ७० वर्षे वयाच्या व्यक्ती ह्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

नाशिकच्या आपले पर्यावरण संस्थेच्या वतीनं सातपूर भागात साकारलेल्या देवराई प्रकल्पात १ हजार ४०० बांबू आणि २५० देशी प्रजातीची झाडे लावण्यात आली. कपिला नदी संवर्धन समितीच्या वतीने कपिला नदीची स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले.

गडचिरोलीतील आलापल्ली वनविभागाच्या वतीनं आलापल्ली-हेमलकसा मार्गावर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ इथं आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मिरकल गावातल्या तलावाची स्वच्छता करण्यात आली आणि १६ किलोमीटरपर्यंत सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.