नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे आपल्या सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताह समारंभाचं उदघाटन करताना बोलत होते. गेल्या आठ वर्षांत भारतानं दर दिवशी एक नवं पाऊल उचललं असून नवीन काम करण्याचा प्रयत्न केल्याचं ते यावेळी म्हणाले. देशाचा विकास आणि गरिबांचं सबलीकरण याला सरकारने गती दिली असून स्वच्छ भारत अभियानानं गरिबांना प्रतिष्ठेचं आयुष्य जगण्याची संधी दिली असं ते म्हणाले. पक्की घरं, वीज, गॅस, पाणी मोफत वैद्यकीयउपचार यामुळे गरिबांना योग्य सन्मान मिळाला तसंच पूर्वीच्या सरकार केंद्रीय प्रशासनाला मागे टाकत देशानं लोक-केंद्रित प्रशासनाकडे वाटचाल केल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचा अर्थ केवळ स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करणं हा नसून स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेलं स्वतंत्र भारताचं स्वप्न पूर्ण करून नव्या जोमानं ते साजरं करण्याचा आहे असं ते म्हणाले. या समारंभात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित नवी नाणी प्रकाशित करण्यात आली.