नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशाच्या १६ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं. १८ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे वेळापत्रक जारी करताना सांगितलं. या वेळापत्रकानुसार निवडणुकीची अधिसूचना येत्या १५ जून रोजी जारी होणार असून नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी ३० जून रोजी होईल, तर २१ जुलै रोजी मत मोजणी होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे.
राज्यघटनेत नमूद केलेल्या पद्धतीनुसार प्रत्येक मताचं मूल्य निर्धारित करण्यात आलं असून त्याआधारे गुप्त मतदानाच्या माध्यमातून राष्ट्रपतींची निवड होणार आहे. लोकसभा, राज्यसभा, सर्व राज्यांच्या विधानसभा आणि नवी दिल्ली तसंच पुडुचेरीसह या केंद्रशासित प्रदेशांच्या विधीमंडळाचे सदस्य या निवडणुकीत मतदार आहेत. संसदेचे ७७६ सदस्य आणि राज्य विधानसभांचे ४ हजार ३३ सदस्य असे एकूण ४ हजार ८०९ मतदार यावेळी मतदान करतील. या सर्व मतांचं मूल्य १० लाख ८६ हजार ४३१ असेल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.