मुंबई : भगवान गौतम बुद्ध यांनी देशाला व जगाला शांती व प्रेमाचा संदेश दिला. भारत व बांगलादेश या देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.
राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते बांगलादेशातील सर्वोच्च संघ परिषदेचे १३ वे संघराजा व बांगला भाषेतून थेरवाद बुद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी अविरत प्रयत्न करणारे डॉ. ज्ञाननश्री महाथेरा यांना शनिवारी (दि.२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघ व बौद्ध धम्म अनुयायी महासंघातर्फे महाथेरा यांना सदर पुरस्कार देण्यात आला.
यावेळी साधनानंद थेरो, राहुल रत्न, उपासक रवी गरुड, घनश्याम चिरणकर, बौद्ध धम्म विचार प्रसाराचे आशिया खंडाचे निमंत्रक राजेंद्र जाधव व जनसंपर्क अधिकारी हेमंत रणपिसे प्रामुख्याने उपस्थित होते.