मुंबई : सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” व त्यातील सर्व उपक्रमांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, राजर्षी शाहूंनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक समतेसाठी खर्ची घातले. स्त्रीशिक्षण, वंचिताचे शिक्षण आणि त्यांचे न्याय्य हक्क यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांनी लोककल्याणकारी अशा अनेक योजना, प्रकल्पांचा पाया घातला. शेती-सिंचन, उद्योग- व्यापार, सहकार या क्षेत्रांना जाणीवपूर्वक चालना दिली. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या या निर्णय – धोरणांचा बहुमोल असा वाटा आहे. राजर्षी शाहूंनी आपल्याला अशा अनेक गोष्टींचा धडा घालून दिला आहे. त्यांची उजळणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यातून आणखी समृद्ध, वैभवशाली महाराष्ट्र उभा करण्यासाठी कटिबद्ध राहुया, हेच राजर्षी शाहूंना अभिवादन. जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!