मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार असून, भाजपाचे राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजेच फेब्रुवारी २०२१ पासून हे पद रिक्त आहे. उद्यापासून विधानसभेचं २ दिवसांचं अधिवेशन राज्यपालांनी बोलवलं आहे.
भाजपानं कुलाबा मतदार संघातले आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. राहुल नार्वेकर २०१९ पासून भाजपात असून, काँग्रेसचे अशोक जगताप यांचा त्यांनी पराभव केला होता. नार्वेकर यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी हे शिवसेनेचे राजापूर मतदार संघातले आमदार असून, आज आघाडीच्या एकत्रित बैठकीत त्यांना उमेदवारी जाहीर झाली. या निवडणुकीत साळवी यांना मतदान करावं यासाठी शिवसेनेतर्फे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी व्हिप जारी केला आहे.