पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना विभागीय क्रीडा संकुल येथे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहूल आवारे व महेंद्र गायकवाड, साक्षी पाटील (तायक्वांदो), अभिजीत खोपडे (तायक्वांदो), समिक्षा शेलार (ज्युदो), भूमिका सर्जे (बास्केटबॉल) या विशेष कामगिरी केलेल्या खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मल्ल काका पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आणि रोटरी प्रांतपाल डॉ. अनिल परमार उपस्थित होते. हडपसर परिसरातील रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर, पुणे डायमंड, हडपसर सेंट्रल, मगरपट्टा सिटी, मगरपट्टा इ-लाईट, फुरसुंगी, अॅमेनोरा, हवेली ईस्ट आणि पुणे व्हायब्रेट ईस्ट या क्लबचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, पालक व रोटरी सभासद उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे प्रभातफेरी
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व हॉकीचे जादूगार मे. ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व पूना कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साह साजरा करण्यात आला. या निमित्ताने पूना कॉलेजच्या मैदानावर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले . प्रभात फेरीत पूना कॉलेज व परिसरातील २० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास २ हजार खेळाडू व क्रीडाप्रेमी सहभागी झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. कसगावडे व प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख यांच्या हस्ते प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. श्री. कसगावडे यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व सांगून प्रत्येक नागरिकांनी शारीरिक व्यायाम करण्याचे तसेच खेळामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ येथे प्रभात फेरीच्या समारोप प्रसंगी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील गणेश राऊत(जुन्नर), संदीप पवार (मुळशी), जालिंदर आवारे (दौंड), सदाशिव सावंत (इंदापूर), सोमनाथ उबाळे (जेजुरी), फिरोज शेख(पिंपरी चिंचवड), आनंद जांभुळकर (मावळ), हेमंत जगताप, अब्दुल मजीद, इम्रान पठाण ,अंजली गोरे, शितल कांबळे, अशोक देवकर (बारामती), अभिजीत राऊत, सनोबर शेख, मार्क भस्मे यांना गुणवंत क्रीडा शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व स्त्री सुरक्षा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली तसेच भित्तिपत्रक, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ.आफताब अन्वर शेख, सहाय्यक क्रीडा अधिकारी दादा देवकाते, प्रा.शिल्पा चाबुकस्वार , महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.एजाज शेख, एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहीर आसी, क्रीडा शिक्षक प्रा.असद शेख इम्रान पठाण आदी उपस्थित होते