पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चिखली भागातील मतदान कायम निर्णायक राहिलेले आहे. यंदाच्या निवडणुकीतही चिखलीकर जनता मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बदलवणार आहे. चिखलीत संतांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या संपपीठाच्या कामात सुद्धा पैसे खाणाऱ्यांना येथील जनतेने घरी बसविण्याचा निर्धार केलेला आहे. मतदारसंघात विकासकामांऐवजी प्रत्येकाच्या जागेवर डोळा ठेवणाऱ्यांना, दादागिरी करणाऱ्यांना ही जनता आता कंटाळली आहे. अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या बाजूने कौल देण्याचा मतदारांनी निश्चिय पक्का केला आहे. निवडणुकीत चिखलीतील जनता कपबशीला मताधिक्य देणार आणि दादागिरीला हद्दपार करणार, असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी गुरूवारी व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी गुरूवारी चिखली भागात काढलेल्या प्रचार पदयात्रेत दत्ता साने बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संगीत ताम्हाणे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, आदी उपस्थित होते.

चिखलीतील साने चौकातून पदयात्रेला सुरूवात झाली. तुळजाभवानी मंदिरात दर्शन पुढे, सानेवस्ती, ताम्हाणेवस्ती, म्हेत्रेवस्ती या भागात पदयात्रा काढून लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. महिलांनी ठिकठिकाणी लांडे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

पदयात्रेत बोलताना माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, “चिखली भागात हातावर पोट भरणारी जनता मोठ्या प्रमाणात राहते. याच जनतेने प्रत्येक विधानसभा निवडणुकीत निर्णायकी भूमिका बजावलेली आहे. मला सुद्धा याच जनतेने राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत ठेवले आहे. चिखलीकर ज्या उमेदवाराच्या पाठीशी, त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित समजला जातो. यंदाच्या निवडणुकीत या भागातील जनता माजी आमदार विलास लांडे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. लांडे यांचे निवडणूक चिन्ह कपबशीचा विजय निश्चित आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात कोणती विकासकामे झाली हेच नागरिकांना आजपर्यंत दिसलेले नाही. हे वास्तव असताना सोशल मीडियावर मात्र रोज आम्ही हे केले, ते केले म्हणून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.

विकासकामे न करता विकासकामांचा भुलभुलैय्या निर्माण करण्यात आला आहे. हे नागरिकांना कळत नाही असे नाही, असा सत्ताधाऱ्यांचा समज आहे. पाच वर्षांत मतदारसंघात फक्त जागा बळकावण्याचा कारभार केला गेला. आमदार आणि त्यांच्या बगलच्च्यांचा डोळा मतदारसंघातील फक्त मोकळ्या जागांवर असल्यामुळे पाच वर्षांत त्यांना विकासाकडे लक्षच देता आले नाही. आता निवडणुकीत जनतेला काय सांगायचे, असा प्रश्न पडल्यानंतर सोशल मीडियाच्या आधाराने चांगले चांगले व्हीडिओ दाखवून फसविण्याचा रोज प्रकार सुरू आहे. चिखलीत संतपीठ उभारण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविले. तसा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मात्र नंतर सत्तेत आलेल्या आमदाराने आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे काम करून संतपीठ आम्हीच उभारल्याची प्रसिद्धी मिळविली.

प्रसिद्धीला आमची काहीच हरकत नाही. पण संतांचे कार्य पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवण्याच्या या पवित्र कामात देखील पैसे खाण्याचा किळसवाणा प्रकार केला गेला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र भूमीत राहणाऱ्या चिखलीकरांना हे समजत नसल्याचे त्यांना वाटते. सोशल मीडियावर काहीही फेकले आणि २०-२५ तरूण सोबत घेऊन फिरले म्हणजेच विकास केला असा त्यांचा समज दिसत आहे. त्यांचा हा भ्रम आता निवडणुकीत हीच जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही. दहशतीच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा विरोधकांचा डाव चिखली भागातील जनता हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. चिखलीतील जनता दादागिरीला मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी कपबशी चिन्हावर मतदान करण्यास कटिबद्ध असल्याचे दत्ता साने यांनी सांगितले.”