मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते विविध मतदारसंघात लागोपाठ सभा घेत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात अकोला, जालना आणि खारघरमध्ये प्रचारसभा घेतल्या.

महाराष्ट्र हे देशाला पाच अब्ज अर्थव्यवस्था करण्यासाठी इंजिनसारखं काम करत असून, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे समीकरण देशाला आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आहे, असंही ते म्हणाले.

मुंबई महानगर क्षेत्रातला पनवेल, बेलापूर, पेण, एरोली, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे हे वेगानं विकसित होत असेलेले भाग आहेत, असंही ते म्हणाले. सरकार या क्षेत्रातल्या विकासासाठी आणि रोजगार निर्मिती तसचं आर्थिक प्रगतीसाठी कटीबद्ध आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे सक्तवसुली संचालनालयाचा आणि सीबीआयचा गैरवापर विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या चौकशांचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये एका प्रचारसभेत बोलतांना सरकार शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्यात अपयशी ठरलं असल्याचा आरोप केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल कणकवली इथं प्रचारसभा घेतली. नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावर जोरदार टीका करत त्यांनी भाजपाला राणे यांच्यापासून सावध राहण्याचा ईशारा दिला. परवाच नारायण राणे यांनी त्यांच्या स्वाभिमान पक्षाचं भाजपात विलीनिकरण केलं होतं.

हरियाणामध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि तोशाम मतदार संघातले उमेदवार किरण चौधरी यांनी विविध भागात प्रचार फेऱ्या काढल्या. त्यांनी आलामपूर, दर्यापूर आणि डांगखुर्द भागात मतदारांशी संपर्क साधला.

हरियाणातली राजकीय परिस्थिती बदलत असून भाजपापासून समाजातले सर्वच घटक नाराज असून हरियाणात काँग्रेस सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काल फरिदाबाद जवळच्या तिगाव इथं प्रचारसभा घऊन कलम ३७० ला विरोध करण्यावरून काँग्रेसवर टीका केली.

महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणूकांबरोबरच येत्या २१ तारखेला बिहारच्या समस्तीपूर आणि महाराष्ट्रातल्या सातारा लोकसभा जागेच्या पोटनिवडणूकांसाठीही मतदान होणार आहे.

या बरोबरच १७ राज्यातल्या ५१ विधानसभा जागांसाठीही पोट निवडणूका होणार असून, यात उत्तर प्रदेशातल्या ११, गुजरातमधल्या ६, केरळ आणि बिहारमधल्या प्रत्येकी ५, सिक्किम मधल्या ३, पंजाब आणि आसाममधल्या प्रत्येकी ४, तामिळनाडू, राजस्थान, हिमाचल प्रदेशातल्या प्रत्येकी २ तसचं ओदिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, पुदुचेरी आणि अरूणाचल प्रदेशातल्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूका होणार आहेत. या सर्वच जागांसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.