राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर व्यापक स्वरुपात जनजागृती होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर, समितीचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा. यासाठी विशेषत: सामाजिक, स्वयंसेवी संस्थेतील प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी. कार्यक्रमाद्वारे व्यापक स्वरुपात जनजागृती करुन नागरिकांपर्यंत तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती पोहचवावी. तंबाखूमुक्त शालेय परिसर करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांच्या समन्वयातून तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करावी अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

श्री. प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शालेय प्राथमिक स्तरावर जनजागृती करण्यात येते. तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्याची गरज आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात यावे, असेही ते म्हणाले.

डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमाबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून विविध कार्यशाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात ऑगस्ट अखेर 34 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 2 हजार 665 नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 26 प्रशिक्षण सत्रांद्वारे 3 हजार 609 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने 39 नागरिकांवर कारवाई करुन 4 हजार 150 रुपये, पोलीस विभागाकडून 405 नागरिकांवर कारवाई करुन 4 हजार रुपये दंडांची रक्कम वसूल करण्यात आली.

पोलीसांकडून ऑगस्टअखेर 1 कोटी 80 हजार रुपयांचा गुटखा जप्त
ग्रामीण आणि शहर पोलिसांनी 2022-23 मध्ये ऑगस्टअखेर 1 कोटी 80 लाख 73 हजार 31 रकमेचा गुटखा, 6 हजार 300 रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले असून सात प्रकरणात गुन्हे दाखल केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत भोई प्रतिष्ठानच्यावतीने लक्ष्मी रस्ता येथील मुख्य गणेशोत्सव मिरवणूकीत ‘तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम’ या विषयावर चित्ररथाद्वारे जनजागृती केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.