नवी दिल्ली : बाजारातल्या इतर कंपन्यांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या दरानं वस्तू विकल्या प्रकरणी वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट, आणि अँँमेझॉन या कंपन्यांची सरकार चौकशी करणार असल्याचं केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या कंपन्यांना एक प्रश्नावली पाठवली असून त्यांच्या उत्तराची प्रतिक्षा आहे, असं त्यांनी सांगितलं. ज्यामुळे किरकोळ दुकानदारांच नुकसान होईल अशा प्रकारे सवलतीच्या दरात आपला माल विकण्याचा अधिकार ई कॉमर्स कंपन्यांना नाही, असंही त्यांनी सांगितलं.

या अशा प्रकारच्या कंपन्या म्हणजे केवळ विक्रेता आणि ग्राहक यांना जोडणारा मंच आहे. जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. अखिल भारतीय व्यापारी संघटनेन या बाबतीत एक पत्र लिहून ई कॉमर्स कंपन्यांचे लेखापरिक्षण करण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.

याबाबतीत कंपन्यांनीच सवलत दिल्याचा फ्लिपकार्ट आणि अँँमेझॉन या कंपन्यांचा दावा पडताळून पाहण्याची विनंतीही या पत्रात केली आहे.