नवी दिल्ली : केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नक्षलवादी विकास विरोधी आहेत. येत्या पाच वर्षात गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथल्या प्रचारसभेत दिली.
आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वनउत्पादनांवर आधारित उद्योग सुरु करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेसच्या काळात कश्मीरमधे 40 हजार लोक मारले गेले, त्यामुळे मोदींनी 370 कलम हटवून कश्मीर दहशतवाद मुक्त केलं, असं ते म्हणाले.
चंद्रपुरात राजुरा इथंही अमित शाह यांची प्रचारसभा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित केला. तसंच विकासाच्या वाटेवर अग्रेसर केला, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही घणाघाती टीका केली. त्यांची यवतमाळ जिल्ह्यात वळी इथंही प्रचारसभा झाली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरु आहेत. राज्य सरकारही त्याच दिशेनं मार्गक्रमण करत आहे, असं शहा म्हणाले.