पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे दोन दिवसीय “Know Japan” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी व शनिवारी (दि.१४ आणि १५ ऑक्टोबर) सकाळी ९ वा. उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम पीसीईटी, इंडो जपान बिझनेस कौंसिल, जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन च्या सहकार्याने शिक्षण व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जपानचे मुंबईतील वाणिज्य दूतावास प्रमुख सल्लागार डॉ. फुकाहोरी यासुकाता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

भारत – जपान संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला आहे. जपानमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच उद्योग जगतातील कामगारांसाठी शिक्षण, संशोधन, रोजगार, उद्योग हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना विविध जपानी विद्यापीठांमध्ये व उद्योगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन आणि करिअरच्या संधी या विषयी मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बारावी पास झालेल्या कोणत्याही शाखेचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यासाठी तसेच पीसीसीओई येथे पिंपरी चिंचवड शहरातील पहिले जपान सुविधा केंद्र कायम स्वरुपी सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि नोंदणी http://www.pccoepune.com/ijbbcknwjapan येथे करावी असे आवाहन पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

यावेळी आंतरराष्ट्रीय संपर्क अधिष्ठाता डॉ. अनुराधा ठाकरे, आंतरराष्ट्रीय संबंध समन्वयक डॉ. रोशनी राऊत, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. शितल भंडारी आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय संपर्क अधिष्ठाता डॉ. अनुराधा ठाकरे यांनी सांगितले की, जपानी भाषा, संस्कृती, परंपरा आणि जपानी समाजातील चालीरीती याविषयी माहिती देणारे चर्चासत्र आयोजित केली आहेत. तसेच जपान मधील उद्योग जगतात असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्राची व्याप्ती, तज्ज्ञ व्यक्तींची चर्चासत्रे, व्यवसाय आणि नवीन संधी याविषयांवर होणारी अनुभवांची देवाणघेवाण भारतीय उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींसाठी उपयोगी आहे.

जपानमध्ये करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी कायम स्वरुपी मार्गदर्शन करणारे व्यासपीठ ठरणार आहे. योग्य सहकारी कंपनी, व्यापारातील संधी आणि जपानमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे सहकार्य उपलब्ध होणार आहे. उद्योगक्षेत्रातील किमान १५० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असेही डॉ. अनुराधा ठाकरे ठाकरे यांनी सांगितले.