नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणुयुद्धाचा धोका कधी नव्हे इतका वाढला असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. रशियाला युक्रेनमधे पराभव पत्करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कमी क्षमतेची अण्वस्त्र वापरण्याचा बेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बोलून दाखवल्यानंतर ते प्रतिक्रीया देत होते. कमी क्षमतेची असली तरी ही अण्वस्त्र नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात आणि जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरु शकतात, असा इशारा बायडेन यांनी दिला आहे. पुतीन यांची अण्वस्त्र वापराबद्दलची वक्तव्यं गांभीर्याने घेतली पाहिजे असा इशारा अमेरिका आणि युरोपीय संघाने यापूर्वीच दिला आहे. मात्र पुतीन यांनी कितीही वेळा शक्यता बोलून दाखवली असली तरी रशिया अण्वस्त्र वापराची तयारी करत असल्याचं दिसत नाही असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.